PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

कर्करोगावर रशियाची लस; शतकातील सर्वात मोठा शोध


 

मॉस्को :कर्करोगासारख्या आजारावर लस शोधून काढल्याचा व चालू शतकातील हा सर्वात मोठा शोध असल्याचा दावा रशियाने केला आहे. एमआरएनए प्रकारातील ही लस पुढील वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यात वापरात येणार असल्याची रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक आंद्रे कॅप्रिन यांनी दिली आहे.

 

त्यांनी सांगितले की, रुग्णाच्या ट्यूमरपासून मिळालेल्या आनुवंशिक घटकांचा वापर करून ही लस विकसित करण्यात आली. तिचा प्रत्येक डोस तयार करण्यासाठी रशियाला २ लाख ४४ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. (वृत्तसंस्था)

 

अमेरिका, ब्रिटनमध्येही प्रयोग सुरू

 

कर्करोगावर लस तयार करण्याचे पाश्चिमात्य देशांतही प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मेंदूच्या कर्करोगावरील रुग्णांवर एका लसीच्या चाचण्या केल्या होत्या.

 

त्याचे आश्वासक परिणाम दिसून आले होते. या रुग्णाच्या प्रतिकारशक्तीत लस टोचल्यानंतर दोन दिवसांत उत्तम वाढ झाली होती. ब्रिटनमध्ये त्वचेच्या कर्करोगावरील लसीच्या चाचण्या सुरू असून त्यांचे निष्कर्षही आश्वासक आहेत. या विकारावर लस तयार करण्याच्या प्रयत्नांत रशियाने आघाडी घेतल्याचे सध्याचे चित्र आहे.

 

रशियाच्या लसीविषयी पाश्चिमात्य देशांना शंका

 

■ रशियाने कर्करोगावरील लस तयार केल्याची घोषणा केली असली तरी तिची परिणामकारकता किती आहे याबद्दल पाश्चिमात्य देशांच्या संशोधकांच्या मनात शंका आहे.

 

■ कर्करोगाचे अनेक प्रकार असून त्यातील नेमक्या कोणत्या प्रकारासाठी ही लस उपयोगात येईल याची अधिक माहिती हाती आल्यानंतरच त्याविषयी अधिक काही सांगता येईल, अशी भूमिका काही शास्त्रज्ञांनी घेतली आहे.

 

संशोधकांचा दावा काय?

 

रशियाने कर्करोगावर लस तयार केल्याचे जाहीर केले असले तरी नेमक्या कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर लस वापरली जाणार याची माहिती दिलेली नाही. लस कर्करोगाच्या पेशींची ओळख पटवून त्या नष्ट करण्याचे काम प्रभावी करेल असा रशियाच्या संशोधकांचा दावा आहे. ट्यूमरची वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या पेशींवर लस प्रभावी ठरेल, असे लस संशोधकांनी सांगितले.